Pune Loksabha : निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर यांच्याकडून मतदान केंद्रांची पाहणी
पुणे, निर्भीड वर्तमान :- पुणे लोकसभेसाठी भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर यांनी पुणे कँटोंमेन्ट विधानसभा मतदारसंघातील एकाच ठिकाणी पाच पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या १४ ठिकाणांना भेटी देऊन पाहणी केली आहे.
एकाच इमारतीत पाच केंद्र असल्यामुळे मतदानासाठी येणाऱ्या मतदारांच्या प्रवेशाचे व निर्गमनाचे योग्य नियोजन करावे, मतदान केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी स्त्री व पुरुष मतदारांसाठी वेगवेगळ्या रांगा असाव्यात, मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत केंद्राची सर्व प्रवेशद्वार खुले ठेवावेत, मतदान केंद्रावर किमान आश्वासित सुविधा पुरवाव्यात, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअर, रॅम्पची सोय करावी, पिण्याचे पाणी, मंडप व्यवस्था करावी अशा सूचना यावेळी श्री. लोलयेकर यांनी केल्या.
निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात ७० ठिकाणी २७४ केंद्र असल्याचे सांगून सर्व ठिकाणच्या अधिकाऱ्यांना वाहतूक व्यवस्थापन तसेच सुविधा केंद्राविषयी योग्य त्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, समन्वयक अधिकारी निवेदिता देशमुख तसेच सर्व केंद्राचे क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.