Pune Police : सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून बाईक रॅलीद्वारे केली मतदान जागृती
पुणे, निर्भीड वर्तमान:- येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सेवानिवृत्त पोलीस वेल्फेअर असोसिएशन आणि मित्र संघटनेच्यावतीने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून बाईक रॅलीद्वारे मतदान जागृती करण्यात आली. पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, सेवानिवृत्त पोलीस वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष भानुप्रताप बर्गे, उपायुक्त राजीव नंदकर आदी यावेळी उपस्थित होते.
आयुक्त डॉ. भोसले यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या प्रांगणातून रॅलीची सुरुवात झाली. यावेळी मतदानाची शपथ घेण्यात आली. मतदानाच्या दिवशी सुट्टी साजरी न करता प्रत्येकाने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन डॉ. भोसले यांनी यावेळी केले.
सीमेवरील सैनिक २४ तास ३६५ दिवस आपल्या व देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत उच्च तापमानामध्ये तसेच थंडी, पावसामध्ये तैनात असतो व आपले कर्तव्य बजावत असतो त्याचप्रमाणे आपणदेखील मतदानासाठी थोडा वेळ काढून मतदानाचे कर्तव्य आणि हक्क बजवावा असे आवाहन श्री.बर्गे यांनी यावेळी केले.
रॅलीमध्ये सुमारे ५०० दुचाकी स्वार सहभागी झाले. घोषणा देत आणि मतदारांना आवाहन करत शनिवार वाडा, लक्ष्मी रोड, अलका टॉकीज, सेनादत्त पोलीस चौकी, नळ स्टॉप, एस एन डी टी कॉलेज, लॉ कॉलेज रोड, भांडारकर रोड, कृषी महाविद्यालय, संचेती हॉस्पिटल, आरटीओमार्गे आंबेडकर चौकात रॅलीचा समारोप झाला.