Pune tourist : पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
पुणे, निर्भीड वर्तमान:- जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे आदी ठिकाणी वर्षाविहार, पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्राधिकरण अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी पर्यटनस्थळ परिसरात ३१ जुलै २०२४ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
जिल्ह्यातील घाट परिसरात पावसाळा सुरू असल्याने बऱ्याच ठिकाणी धबधबे तयार झालेले आहेत. तसेच भुशी, मुळशी, भाटघर, खडकवासला धरण परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक वर्षाविहार पर्यटनासाठी येत असतात. सुट्टीच्या दिवशी राज्याच्या विविध भागातून तसेच मुंबई शहर व पुणे शहरातून पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अशावेळी वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सदर आदेश देण्यात आले आहेत.
मावळ तालुक्यातील भुशी डॅम, धरणे व गड किल्ले परिसर, वडगाव मावळ येथील बेंदेवाडी, डाहुली’ (आंदर मावळ) पाण्याचे धबधबे व लोणावळा शहर आणि ग्रामीण हद्दीतील धरण व गडकिल्ले परिसर टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, राजमाची पॉईंट, खंडाळा, सहारा ब्रीज, पवना धरण, टाटा धरण, घुबड तलाव परिसर, मुळशी तालुक्यातील मुळशी धरण व ताम्हीणी घाट जंगल परिसर व मिल्कीबार धबधबा, हवेली तालुक्यातील खडकवासला धरण, वरसगाव धरण व सिंहगड, गडकिल्ले परिसर, आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर, डिंभे धरण परिसर, कोंडवळ धबधबा, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट तसेच धरणे व गडकिल्ले परिसर, शिवनेरी व माणिक डोह, भोर तालुक्यातील भाटघर धरण व गडकिल्ले परिसर, पाण्याचे धबधबे, वेल्हा तालुक्यातील धरण व गडकिल्ले परिसर, कातळधरा धबधबा, खेड तालुक्यातील चासकमान धरण व भोरगिरी घाट, पाण्याचे धबधबे व जंगल परिसर आणि इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव बोटींग क्षेत्रात हे आदेश लागू असतील.
या आदेशानुसार पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील, पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, थोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास प्रतिबंध राहील.
पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश, कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे, वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकण्यासही प्रतिबंध राहील.
सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डिजे यंत्रणा वाजविणे, त्यामुळे ध्वनीप्रदूषण करणे, ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करणे, धबधब्याच्या 1 किलोमीटर परिसरात सर्व दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ आपत्ती व्यवस्थापनाच्या वाहनांना अनुमती असेल.
या आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उल्लघंन केल्यास ते आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ नुसार दंडनिय अथवा कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.