Pune Traffic : रस्त्यांची दुरावस्था व वाहतूक कोंडी यावर तातडीने उपाय योजना करा – खासदार सुप्रियाताई सुळे
पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील जागतिक दर्जाचे आय टी हब अशी ओळख असणाऱ्या हिंजवडी येथील ‘राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान‘ परिसरातील रस्त्यांची दुरावस्था व वाहतूक कोंडी यावर तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नागरिकांची सुरक्षितता या सारख्या पायाभूत सुविधा गतीने पूर्ण करण्यात याव्यात यासाठी बारामती लोकसभा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुण्याचे पालकमंत्री यांना पत्र दिले आहे.
माण, मारुंजी, म्हाळूनगे, भूमकर चौक या मार्गावरून पुण्यातील विवीध भागातून उद्योग, नोकरी निमित्त हिंजवडी आय टी परिसरात येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्या तुलनेत या ठिकाणचे रस्ते अरुंद आहे. त्याचबरोबर या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे, रस्त्यांना लहान मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यामूळे हे रस्ते अधिकच खड्डेमय आणि चिखलमय झाले आहे. काही ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्त्यांची रुंदी कमी होऊन वाहतूक कोंडी होत आहे. भूमकर चौकात उड्डाणपूलाखाली मोठे तळे साचते. आदि कारणांमुळे त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. नोकरी निमित्त येणाऱ्या नागरिकांना दररोज २ – ३ तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे.
वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी या भागातील रस्त्यांची सुधारणा करणे, रस्ते रुंद करणे, आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल बांधणे, वाहतूक मार्गात बदल करणे, सर्विस रस्त्यांची रुंदी वाढविणे, रस्त्यांवरील खड्डे भरणे, दुभाजक आणि पदपथांच्या दुरुस्तीची कामे करणे या सारख्या उपाय योजना करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर एमआयडीसी परिसराबाहेरील काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था उभारावी.
हिंजवडी परिसर व एम आय डी सी येथील या समस्यांचे निराकरण करणेसाठी विभागीय आयुक्त, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी, पीएमआरडीए, पीएमसी, पीसीएमसी, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा परिषद, पोलिस प्रशासन व इतर संबंधित शासकीय यंत्रणांची संयुक्तिक बैठक पालकमंत्री यांच्या मार्फत आयोजित करण्यात यावी व या परिसराची पाहणी करून, विकास करण्याकरिता विकास आराखडा करण्यात यावा अशी पत्रात विनंती करण्यात आली आहे.