Registration for Home Guard : पुणे जिल्हा पथक अंतर्गत होमगार्डसाठी सदस्य नोंदणीचे आवाहन
पुणे : पुणे जिल्हा पथकांतर्गत रिक्त असलेल्या होमगार्डच्या १ हजार ८०० जागा भरण्याकरिता होमगार्ड सदस्य नोंदणीचे आयोजन केलेले असून पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी ११ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा होमगार्ड कार्यालयाने केले आहे.
होमगार्ड नोंदणी नियम व अटी- उमेदवार कमीत कमी १० वी उत्तीर्ण असावा. वय २० वर्ष पूर्ण ते ३१ जुलै रोजीच्या अर्हता दिनांकवर ५० वर्षाच्या आत असावे. उंची पुरुषांकरीता १६२ से.मी. व महिलांकरीता १५० से.मी. असावी. छाती फक्त पुरुष उमेदवारांकरीता ७६ से.मी. व कमीत कमी ५ सेमी फुगविणे आवश्यक असेल.
उमेदवाराचा रहीवासी पुरावा, आधारकार्ड. शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र, जन्म दिनांक पुराव्याकरीता माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व शाळा सोडल्याचा दाखला, तांत्रिक अहर्ता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र, खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.
होमगार्ड नोंदणीचे अर्ज पुणे जिल्ह्याकरिता ११ ऑगस्ट रोजी सायं. ५ वाजेपर्यत https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर इंग्रजी भाषेमधूनच भरता येतील. आधारकार्ड क्रमांक, जन्म दिनांक व्यवस्थित नोंद करावे. एका उमेदवाराला आधारकार्ड क्रमांकाच्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल. उमेदवार ज्या भागातील रहीवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील.
अर्ज सादर केल्यावर नोंदणी अर्जाची छायांकीत प्रत काढावी. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिटकवावा, मराठी मधील नाव उमेदवारानी स्वतः लिहायचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरू नये. सर्व अर्जाची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणीकरीता तारीख जाहीर करण्यात येईल.
शारीरिक क्षमता चाचणी- पुरुष उमेदवाराकरिता १६०० मीटर तर महिला उमेदवाराकरिता ८०० मीटर धावणे, पुरुष उमेदवारांना ७.२६० कि. ग्रा. वजनाचा तर महिला उमेदवारांना ४ कि. ग्रा. वजनाचा गोळाफेक अशा पद्धतीने नियमानुसार घेण्यात येईल. गोळाफेक चाचणीसाठी उमेदवाराला जास्तीजास्त तीन संधी दिल्या जातील व त्यातील अधिकतम अंतर ग्राह्य धरले जाईल. शारीरिक क्षमता चाचणी पात्र ठरल्यानंतरच तांत्रिक अर्हतांचे गुण विचारात घेतले जातील.
कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरीता येताना सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेवून यावे. दोन छायाचित्रे व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरीता बंधनकारक राहील. उमेदवारांना नोंदणीकरीता स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
नोंदणी दरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील. पात्र उमेदवारांची अंतिम निवड होमगार्ड पथकनिहाय रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांस प्राधान्य दिले जाईल. तसेच वय समान असेल तर शैक्षणिक अर्हता व तांत्रिक प्रमाणपत्रांच्या आधारावर निवड निश्चित करण्यात येईल.
यापुर्वी होमगार्ड संघटनेतून अकार्यक्षम बेशिस्त ठरल्याने न्यायालयीन प्रकरणी दोषी असल्याने सेवा समाप्त केलेले होमगार्ड नोंदणीसाठी अर्ज करण्यास अपात्र ठरतील. मात्र स्वेच्छेने राजीनामा दिलेले होमगार्ड विहीत अटी पूर्ण करीत असतील तर अर्ज करण्यास पात्र राहीतील.
अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. पथक पोलीस ठाणेनिहाय रिक्त जागा निश्चित करण्याचे सर्व अधिकार जिल्हा समादेशक यांनी राखून ठेवले आहे. अर्ज भरण्यासंदर्भात काही अडचण असल्यास जिल्हा होमगार्ड कार्यालय, पुणे येथील भ्रमणध्वनी क्रमांक ९०७५७४७४७१ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण तथा जिल्हा समदेशक होमगार्ड रमेश चोपडे यांनी केले आहे.