WAKAD TDR SCAM : टिडीआर घोटाळ्या बाबत रस्त्यावरची व कायदेशीर लढाई सुरूच ठेवणार – संभाजी ब्रिगेड
तीन महिन्यानंतर संभाजी ब्रिगेडचे उपोषण तात्पुरते स्थगित
पुणे, निर्भीड वर्तमान:- वाकड येथील मे.विलास जावडेकर इन्फीनीटी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड टीडीआर घोटाळा ( WAKAD TDR SCAM ) काही महिन्या पूर्वी विरोधी पक्ष नेते मा.विजय वडेट्टीवार यांनी उघडकीस आणला होता. पिंपरी चिंचवड महापालिकेतील आजवरचा सर्वात मोठा हजारों कोटी रूपयांचा टीडीआर घोटाळा उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ माजली आहे.
विविध राजकीय पक्ष व संघटनांनी या ( WAKAD TDR SCAM ) घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी अनेक आंदोलने केली. महाराष्ट्र सरकारने चौकशीचे आश्वासन दिले असुन सदर प्रकल्पास स्थगिती दिली आहे. परंतू दोषींवर कोणतीही कारवाई केलेली नाही. संभाजी ब्रिगेडने या विषयावर अनेक प्रकारची आंदोलने केली आहेत. गेल्या सहा फेब्रुवारी पासून महापालिका गेट समोर तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ साखळी उपोषण संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे व सहकार्यांनी केले आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या दालनासमोर देखील आंदोलन केले परंतू आयुक्तांनी कोणतीही कारवाई दोषींवर केली नाही.
माहिती अधिकारातून उपलब्ध कागदपत्रातून या घोटाळ्यात नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड, शहर मुख्य अभियंता मकरंद निकम तसेच स्वत: आयुक्त शेखर सिंह यांचे सहित अनेक अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे.त्यामुळे दोषींवर आयुक्त कारवाई करत नाहीत.हे लक्षात आल्यामुळे येथून पुढे संभाजी ब्रिगेड कायदेशीर व रस्त्यावरील लढाई लढणार आहे. सर्व दोषींवर कारवाई होईपर्यंत गप्प बसणार नाही. दोषींवर ईडी,लाचलुचपत विभाग,पोलीस महासंचालक तसेच नगर विकास मंत्रालया कडून कारवाई साठी पाठपुरावा करणार प्रसंगी न्यायालयात दाद मागणार असा इशारा आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहराध्यक्ष सतिश काळे यांनी दिला आहे.
तसेच गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेले साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असून सदर उपोषण सतिश काळे, गणेश दहिभाते, वैभव जाधव, रवींद्र चव्हाण, वसंत पाटील, रावसाहेब गंगाधरे, अभिषेक गायकवाड, सुभाष जाधव इतर सहकार्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत मागे घेतले आहे.