दीक्षाभूमीवर सुरक्षा, आरोग्य व स्वच्छतेसंदर्भात प्रशासनाकडून आधुनिक सुविधा
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सुविधांचा आढावा
वर्तमान टाईम्स, वृत्तसेवा :- दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना उत्तम सुविधा देण्यासाठी जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाने यावर्षी आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. १०० डॅाक्टर २४ तास उपलब्ध असून ४ हजार पोलिस मदतीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय महानगरपालिकेने ठिकठिकाणी डिजिटल बोर्ड लावून सुविधांची माहिती दिली आहे. शौचालय, पिण्याचे पाणी, तात्पुरता निवारा रस्त्यावरची स्वच्छता या मूलभूत सुविधांसाठी १ हजार कर्मचारी पुढील ३ दिवस उपलब्ध असतील.
दीक्षाभूमीवर यावर्षी मोठ्या प्रमाणात अनुयायी येणार असल्याची शक्यता परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने वर्तवली आहे. एक दिवसाआधीच यावर्षी हजारो बांधव दर्शनासाठी दीक्षाभूमीवर पोहोचले आहेत. आज ही संख्या वाढण्याची शक्यता असून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काल २ तास दीक्षाभूमी परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी महानगरपालिकेसोबत पूरक व्यवस्था म्हणून आरोग्य उपसंचालक कार्यालयामध्ये आरोग्य शिबिराचे अधिकृत उद्घाटन केले. याठिकाणी २४ तास तज्ज्ञ डॅाक्टर उपलब्ध राहणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथील डॅाक्टर, निवासी डॅाक्टर यांची यासाठी तैनाती करण्यात आली आहे. याठिकाणी गंभीर रुग्णांपासून सर्वसामान्य आजारांपर्यंत उपचार, औषधोपचार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन वानरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने संयुक्तरित्या यावर्षी सुविधांच्या उपलब्धतेसंदर्भात http://www.deekshabhoomiinfo.in हे विशेष संकेतस्थळ सुरू केले असून सर्व अत्यावश्यक सोयीसुविधांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिकांनी या संकेतस्थळाचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये माहितीदर्शक नकाशादेखील उपलब्ध करण्यात आला आहे. डिजिटल बोर्डद्वारे अनुयायांना सर्व सूचना देणे सुरू केले आहे. महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्ष उघडला असून दीक्षाभूमीवर असणाऱ्या स्वच्छतेच्या सुविधांमध्ये अडचण आल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दीक्षाभूमी परिसरात ठिकठिकाणी पुस्तकांचे स्टॅाल उभारण्यात आले आहेत. यात विविध प्रकारचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे.
ठिकठिकाणी स्वच्छता दूत तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी जागोजागी नळ बसविण्यात आले आहेत. परिवहन व्यवस्थेचीही काळजी महानगरपालिकेकडून घेण्यात येत आहे. यासाठी विशेष बसेसची व्यवस्था वाहतूक विभागाने नेमून दिलेल्या ठिकाणापर्यंत करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार
सायंकाळी ६ वाजता दीक्षाभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुज्य भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई असतील. तर प्रमुख अतिथी श्रीलंका येथील रेव्ह. डब्ल्यू. धम्मरत्न थेरो असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.