“यापुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही”- चिन्मय मांडलेकर
चिन्मय मांडलेकर आणि त्याच्या कुटुंबाला या ट्रोलिंगचा खूप त्रास होतोय.
निर्भीड वर्तमान:- मराठी अभिनेता व लेखक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिन्मय मांडलेकरने मोठा निर्णय घेतला आहे. मुलाच्या नावावरून झालेल्या ट्रोलिंगमुळे त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेची रजा घेत असल्याचं जाहीर केलं. मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून चिन्मय मांडलेकरला गेले काही दिवस सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यामुळे अभिनेत्याच्या कुटुंबाला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. याच पार्श्वभूमीवर व्हिडीओ शेअर करत चिन्मयने त्याच्या चाहत्यांजवळ आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागत या भूमिकेची मी रजा घेतो” असं चिन्मयने व्हिडीओ शेअर करत सांगितलं आहे. परंतु, त्याने घेतलेल्या या निर्णयावर त्याच्या चाहत्यांसह कलाकार मंडळींनी नाराजी दर्शवली आहे. “दादा हा निर्णय तू मागे घे” अशी विनंती अभिनेत्याचे चाहते त्याच्याकडे करत आहेत. अशातच काही मराठी कलाकारांनी देखील घडल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. तर मृण्मयी व गौतमी देशपांडे, अदिती सारंगधर, सुरुद गोडबोले यांच्या पाठोपाठ आता चिन्मयसाठी सिद्धार्थ चांदेकरने पोस्ट शेअर केली आहे.