सह्याद्री अतिथीगृह येथे नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना नियुक्तीपत्र प्रदान..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- सह्याद्री अतिथीगृह येथे ‘एकात्मिक बाल विकास सेवा योजनें’ अंतर्गत भरती प्रक्रियेद्वारे नवनियुक्त झालेल्या १९ हजार ५७७ अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यापैकी मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील ५८ अंगणवाडी कर्मचारी यांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच चौथ्या महिला धोरणाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शासकीय रिक्त पदे भरण्याला प्राधान्य दिले असून त्यांची आज झालेली नियुक्ती म्हणजे एक सेवेची संधी आहे. या कामाच्या माध्यमातून राज्यातील बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी आणि महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच त्यांनी नियुक्ती पत्र देण्यात आलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बालकांना शिक्षण देणे व त्यांचे योग्य पोषण करून त्यांचा मानसिक विकास करणे यामध्ये मोलाची कामगिरी अंगणवाडी कर्मचारी बजावत असतात. शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवले असून विविध महिला विकासाच्या योजना शासन राबवत असून महिलांच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.
अंगणवाडी कर्मचारी हे फक्त पोषण आहार देणे व बालकांचे संगोपन करणे एवढेच काम करीत नसून सुदृढ बालक आणि सक्षम पिढी घडविण्याचे काम करीत असतात. राज्यातील प्रत्येक बालक सुदृढ होण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात त्यांना पाठबळ देण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिली.
महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड, स्माईल फाऊंडेशनच्या संचालक उमा आहुजा व धीरज आहुजा, मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील ५८ नवनियुक्त अंगणवाडी कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.