ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण सुभाष देसाई यांनी केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण सुभाष देसाई यांनी आज नरिमन पॉईंट येथील बाळासाहेब भवन येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सुरु असलेली वाटचाल आणि राज्यातील महायुतीचे सरकार करत असलेल्या कामामुळे प्रभावित झाल्यामुळेच आपण पक्षप्रवेश करत आहोत, असे भूषण देसाई यांनी याप्रसंगी सांगितले.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला असल्याचे त्यांनी याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी यासमयी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नमूद केले.
याप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.