ताज्या घडामोडीपुणेराजकीयसामाजिक

Baramati Loksabha : निवडणूकीच्या मतदानासाठी ७ मे रोजी कामगारांना भरपगारी सुट्टी

बारामती, निर्भीड वर्तमान :- जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदासंघाकरीता मंगळवार ७ मे रोजी मतदान होत असून मतदारसंघातील सर्व आस्थापनांनी कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या आणि पुणे शहराशी संलग्न असलेल्या भागातील नागरिकांनी मतदान केंद्राची माहिती घेवून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही डॉ.दिवसे यांनी केले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर व खडकवासला असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. भोर विधानसभा मतदारसंघात म्हाळुंगे, सूस व बावधन बु., ताथवडे, हिंजवडी, पिरंगुट, मान, भुकूम, भुगाव, लवळे तर खडकवासला विधानसभा मतदारसंघात कात्रज, धायरी, नऱ्हे, वडगाव बुद्रुक, वारजे, शिवणे खडकवासला, खेड शिवापुर, बिबेवाडी (काही भाग) या शहरी भागाचा समावेश करण्यात आलेला आहे. या भागातील मतदारांना मतदान करता यावे यासाठी मतदनाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

शहरी भागातील नागरिकांनी आपल्या मतदान केंद्राविषयी माहितीकरीता जवळचे मतदान केंद्र किंवा मतदान सहायता कक्षाशी संपर्क साधावा. भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation या लिंकवर क्लिक करुन आपल्या मतदान केंद्राविषयी माहिती घेता येणार आहे. वोटर हेल्पलाईन ॲपवरही मतदान केंद्राची माहिती घेता येईल.

बारामती मतदारसंघातील ग्रामीण भागासोबत शहराशी संलग्न भागात उद्योग, उर्जा व कामगार विभागाअंतर्गत असलेल्या सर्व आस्थापना, कारखाने व दुकान मालक, व्यवस्थापनांनी कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी येत्या ७ मे रोजी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सर्व आस्थापना, कारखाने व दुकाने उदा. खाजगी कंपन्यामधील आस्थापना, दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, खरेदी केंद्रे , मॉल्स, किरकोळ विक्रेते आदी ठिकाणी कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देवून मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करावे, असेही आवाहन डॉ. दिवसे यांनी दिले आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!