Hathras : हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या परिवारातील प्रत्येकी एका व्यक्तीला राज्य सरकारने नोकरी द्यावी
हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या परिवाराची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट
मुंबई, दि.9:- उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्हात एका धार्मिक कार्यक्रमात जमलेल्या प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरी होऊन 121 निष्पाप जणांचा बळी गेला. ही दुर्घटना अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या परिवाराला राज्य सरकारने सांत्वनपर मदत जाहिर केली आहे. मात्र त्या सोबत संबंधीत कार्यक्रमाचे आयोजक नारायण साकार हरि या बाबाच्या संपत्तीतुन हाथरस दुर्घटनेतील परिवाराला आणि जखमींना सांत्वंनपर आर्थीक मदत करावी. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या परिवारातील एका व्यक्तीला उत्तर प्रदेश राज्य सरकारने नोकरी द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्याकडे केली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज उत्तर प्रदेशातील हाथरस मधील नवीपुर येथे हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या परिवाराची भेट घेतली.यावेळी दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रध्दांजली अपर्ण करण्यात आली.पुन्हा अशी दुर्घटना घडता कामा नये अशी खबरदारी राज्य सरकारने घ्यावी याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले.पोलिस प्रशासनाने याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली असून चौकशी चालू आहे. या प्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली.
पिडित परिवाराच्या पाठिशी रिपब्लिकन पक्ष खंबीर उभा राहील असे ना.रामदास आठवले म्हणाले. रिपब्लिकन पक्षाचे उत्तरप्रदेशचे अध्यक्ष पवन गुप्ता,उपाध्यक्ष विनोद कुमार, किशोर मासुम, सचिव हरि ओम आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.